बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरु असून, अजूनही आरोपींचा शोध लागू शकला नाही.
कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईवर सलमान खानला अनेकवेळा जिव्या मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी अभिनेत्याच्या निवासस्थानी देखील गोळीबार झाला होता. या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही आरोपीना अटक देखील केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई परिवहन विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक मेसेज आला होता. मेसेजमध्ये अभिनेता खानला त्याच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी धमकीच्या संदेशाची चौकशी सुरू केली आहे.
काळवीट प्रकरणामुळे लक्ष्य?
काळवीट मारल्याच्या आरोपावरून सलमानला बिश्नोई गँगकडून अनेक वेळा धमक्या मिळाल्या आहेत. हे प्रकरण १९९८ चे आहे.
२०२४ मध्येही या अभिनेत्याला धमक्या मिळाल्या होत्या, ज्यामध्ये त्याला मंदिरात जाऊन सार्वजनिकरित्या माफी मागण्यास किंवा ५ कोटी रुपये देण्यास सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी सलमान खानकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली होती.