Eknath Khadse: शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील वाद महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. दोघेही जळगाव जिल्ह्याचे असल्याने, जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांच्यात नेहमीच संघर्ष होत असतो. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाद सुरू झाला आहे.
नेमके प्रकरण काय ?
गिरीश महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनीही मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवरती आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अर्थातच एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेनंतर गिरीश महाजन यांच्याबाबत विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.आता गिरीश महाजन यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून एकनाथ खडसेंना अब्रु नुकसानीची नोटीस पाठविण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे २०१६ मध्ये आमदार जयकुमार गोरेंवरतीही एका महिलेने गंभीर आरोप केला होता. हे प्रकरण आतापर्यंत चर्चेत आहे. जयकुमारे गोरे ही महिला खोटे बोलत असल्याचे सांगत होते. या महिलेने जयकुमार गारेंचे प्रकरण मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे तीन कोटींची मागणी केली होती. यातील एक कोटींची रक्कम स्विकारताना संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रवादी गटापर्यंत पोहचत असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान वरील दोन प्रकरणाचा बारकाईने विचार केला तर लक्षात येते की राजकीय नेते आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून पातळी सोडून टीका करत आहेत. एखाद्या नेत्याचे एखाद्या ‘महिलेशी संबंध आहेत’ हा मुद्दा नक्कीच राजकीय असू शकत नाही. उगाच आरोप करायचे म्हणून वैयक्तिक आयुष्यावर टीका करणे हे राजकीय व्यक्तींना न शोभणारे आहे. अर्थातच अलीकडे महाराष्ट्रात एकमेकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे प्रकार वाढले आहेत, ज्यामुळे राज्याच्या राजकारणाची प्रतिष्ठा मलिन होत चालली आहे, असे अनेकांचे मत आहे.
चारित्र्यावर शिंतोड उडवणे हे राजकीय लोकांचे राजकारणाती एक प्रमुख अस्त्र ठरत चालले आहे. एकंदरित वैयक्तिक आरोप, नैतिक मूल्यांचा अभाव, ध्रुवीकरण आणि विकासकामांकडे दुर्लक्ष हीच राज्याच्या राजकारणाची वैशिष्ट्ये बनत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.