Pashupati Kumar Paras: राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात जाहीर केला आहे. पशुपती कुमार पारस एनडीएमधून बाहेर पडल्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात, अशा चर्चा आहेत.
पशुपती कुमार पारस यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचे कारण सांगितले आहे की, एनडीएमध्ये त्यांच्या पक्षाला योग्य सन्मान मिळत नाही. तसेच एनडीएच्या बैठकांमध्ये त्यांच्या पक्षाचा उल्लेखही केला जात नव्हता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
पशुपती कुमार पारस यांनी एनडीएमधून बाहेर पडताच त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आता आम्ही बिहारमधील सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहोत. जर महाआघाडीने योग्य सन्मान दिला, तर आम्ही त्यांच्यासोबत युती करण्याचा विचार करू, असे म्हणत त्यांनी महाआघाडीसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे.
परंतु कोणासोबत युती करायची हे अजून निश्चित झाले नाही, मात्र आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असेदेखील पशुपती कुमार पारस यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते कोणासोबत युती करतात, यावर बिहारच्या विधानसभा निवडणुकीची गणिते काहीशी अवलंबून असतील.