अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या मुख्य शिखरावर १६१ फूट उंच कलश बसवण्यात आला आहे. हा खास क्षण सोमवारी सकाळी ९.१५ वाजता वैदिक विधी, मंत्रोच्चार आणि पूजा यांसह पार पडला. दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी हे काम पूर्ण झाले. विशेष म्हणजे ही प्रतिष्ठापना वैशाखीच्या दिवशी झाली शिवाय या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीही जयंती होती.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, हे शिखर मंदिराच्या गर्भगृहावर आहे जिथे रामलल्ला विराजमान आहेत. याशिवाय, मंदिर संकुलात तयार होत असलेल्या इतर सहा मंदिरांवरही अशाच प्रकारे कलश बसवले जातील. या सर्व शिखरांवर कलश चढवण्याचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी २४ तास बांधकाम सुरू आहे.
मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबाराची स्थापना झाली आहे. संकुलात तयार होणाऱ्या इतर मंदिरांमध्ये विविध देवतांच्या मूर्तींची स्थापना केली जात आहे. काही मंदिरांतील मूर्तींची स्थापना पूर्ण झाली असून, उर्वरित ‘शेषावतार’ मंदिराचे कामही लवकरच पूर्ण होईल.कलश बसवल्यानंतर मंदिराच्या आत बसवलेली यंत्रे उघडून काढण्याचे कामही लवकरच होणार असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली आहे.