गडचिरोली हे गाव एकेकाळी नक्षलवादासाठी ओळखले जायचे. तिथली परिस्थिती खूप बिकट होती. पोलिस संरक्षणाशिवाय कुणी तिथे जाऊ शकत नव्हते. असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 29 वर्षांपूर्वीचा एक अनुभव सांगितला आहे. सोमवारी मुंबईत कै लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने आयोजित केलेल्या ‘कर्मयोगी’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की एकदा मी निवडणुकीच्या प्रचारासाठी गडचिरोलीला गेलो होतो. तेव्हा पोलिसांनी मला पूर्णपणे घेरले होते. इतकेच नाही तर चहा पिण्यासाठी देखील पोलिस तंबू उभारू देत नव्हते. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.
गडकरींचा मेगा प्लान:
गडकरी म्हणाले की, गडचिरोलीसारख्या मागासलेल्या भागाचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत. गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवण्यासाठी त्यांनी मेगा प्लानही सांगितला आहे ते म्हणाले की गडचिरोली येथून एक रस्ता काढायचा आहे. जो थेट विशाखापट्टणम पोर्टला जोडला जाईल. रायपूर ते विशाखापट्टणम एक एक्सप्रेस बांधत आहोत. रस्ते झाले की व्यापार, आणि उद्योगांच्या संधी वाढतील, तसेच त्या भागाचा विकास होईल आणि चित्र बदलेल.
मोठी गुंतवणूक:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे जाऊन गडचिरोलीसाठी तब्बल 6.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. या भागात जगातील सर्वोत्तम दर्जाचं लोखंड तयार करण्याचा मोठा प्रकल्प येणार आहे. असेही गडकरी यांनी म्हंटले आहे.
स्थानिकांसाठी रोजगार:
या प्रकल्पामुळे 80% स्थानिक तरुणांना काम मिळेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की आधी नक्षलवादी असलेले सुमारे 3,000 लोक आता काम करत आहेत त्यांनी नक्षलवाद सोडून दिला आहे.
शिक्षण आणि समाजकारणाचा भर:
गडकरी म्हणाले की, गडचिरोलीत आज 1200 शिक्षक आहेत आणि 30,000 विद्यार्थी शिकत आहेत. येत्या काळात ही संख्या 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी. त्यासाठी 500 विद्यार्थ्यांचे हॉस्टेल उभारण्याचाही निर्णय घेतला आहे.
वस्तूतः गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार नक्षलवाद या विषयांबाबत अधिक सतर्क झाले असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना आत्मसर्मपण करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून आला. चालू वर्षात केवळ चार महिन्यात ५२१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याच्या माहितीची नोंद झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गडकरींनी गडचिरोलीसाठी हा मोठा विकास आराखडा मांडला आहे. रस्ते, उद्योग, शिक्षण आणि रोजगार यांच्यामाध्यामातून नक्षलवाद संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकेकाळी नक्षलवादाने ग्रस्त असलेला गडचिरोली आता प्रगतीच्या मार्गावर आहे.