Mamata Banerjee: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्यातील सुधारणांविरोधात उसळलेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण बेघर झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या हिंसाचारामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी अनेक ठिकाणी तोडफोड आणि आगजनी केली. यात सामान्य नागरिकांच्या घरांचे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. भीतीमुळे अनेक कुटुंबांनी आपले घर सोडून शेजारच्या मालदा जिल्ह्यात आश्रय घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. इंटरनेट सेवा देखील काही भागांमध्ये तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारावर राजकीय प्रतिक्रियाही येत आहेत. भारतीय जनता पक्षाने या हिंसाचारासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे, तर तृणमूल काँग्रेसने बाहेरील शक्तींचा हात असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला हिंसाग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा दलतैनात करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, परिस्थितीकडे डोळेझाक करता येणार नाही.या घटनेमुळे मुर्शिदाबादमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेक लोक आपल्या घरी परतण्यास घाबरत आहेत. प्रशासनाकडून परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, मुर्शिदाबाद हा मुस्लिमबहुल जिल्हा आहे आणि येथे वक्फ मालमत्तांची संख्याही अधिक आहे. त्याच पार्श्वभूमीवर वक्फ कायद्यातील प्रस्तावित बदलांमुळे मुस्लिम समुदायाच्या धार्मिक आणि मालमत्तेसंबंधी अधिकारांवर परिणाम होण्याची भीती आंदोलकांना आहे. याच कारणामुळे मुर्शिदाबाद जिल्ह्यात आंदोलन उसळले आहे.