Lockie Ferguson: पंजाब किंग्स टीम यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे पंजाब किंग्जचे चाहते खुश आहेत. परंतु आता बंजाब किंग्जच्या चाहत्यांसाठी एक मोठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. पंजाबचा प्रमुख वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
लॉकी फर्ग्युसनला मागच्या सामन्यात म्हणजेच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळत असताना केवळ दोन चेंडू टाकल्यानंतर डाव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदान सोडून गेला होता. आता पंजाब किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी त्याच्या दुखापतीची माहिती अपडेट आहे. होप्स यांनी म्हटले आहे की, फर्ग्युसनला गंभीर दुखापत झाली आहे आणि तो या हंगामात परतण्याची शक्यता खूप कमी आहे.
फर्ग्युसनने या हंगामात पंजाब किंग्ससाठी चार सामने खेळले आणि ९.१६ च्या इकॉनॉमी रेटने ५ विकेट्स घेतल्या होत्या. यापूर्वी तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकला होता. परंतु आता लॉकी फर्ग्युसन बाहेर पडल्यामुळे पंजाब किंग्जच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाला मोठा फटका बसला आहे.
आता पंजाब किंग्जकडे फर्ग्युसनची जागा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेट आहे. तसेच अफगाणिस्तानचा अष्टपैलू अझमतुल्लाह उमरझाई आणि भारतीय खेळाडू म्हणून विजय कुमार वैशाख देखील आहेत. परंतु संघ व्यवस्थापन आता लॉकी फर्ग्युसनच्या जागी कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.