सोमवारी (१४ एप्रिल) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी हिसार आणि यमुनानगरमध्ये सभा घेतल्या. त्याचवेळी एक भावनिक आणि खास घटना घडली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
कैथल जिल्ह्यात राहणारे रामपाल कश्यप यांनी १४ वर्षांपूर्वी एक संकल्प केला होता “जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि मी त्यांना प्रत्यक्ष भेटत नाही, तोपर्यंत मी बूट/चप्पल घालणार नाही.”अखेर ती घडी आली! पंतप्रधान मोदी हरियाणात आले तेव्हा त्यांना रामपाल यांच्या संकल्पाची माहिती मिळाली. त्यांनी स्वतः रामपाल यांना भेटीसाठी बोलावले. या भेटीत मोदींनी त्यांना बुटांची एक जोड भेट दिली आणि स्वतः त्यांच्या पायात ते बूट घातले.
मोदी म्हणाले, “आज मी तुला बूट घालतो आहे, पण पुढे असा संकल्प करू नकोस. तुला काम करायचं आहे, स्वतःला त्रास का द्यायचा?”रामपाल भावूक होऊन म्हणाले, “मी १४ वर्षांपासून चप्पल घातली नाही. मी ठरवलं होतं की तुमच्यासमोरच पहिल्यांदा घालीन. स्वप्नातही वाटलं नव्हतं की प्रत्यक्ष भेट होईल.”
या प्रसंगी पंतप्रधान मोदी देखील भावुक झाले पाहायला मिळाले. रामपाल यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. मोदींनी स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं, की “रामपालजींच्या भावना मी मानतो, पण अशा प्रकारचे संकल्प न करता देश आणि समाजासाठी काही चांगले संकल्प घ्या.”
कोण आहेत रामपाल कश्यप?
https://twitter.com/narendramodi/status/1911756643777618032
रामलाल कश्यप हे हरियाणामधील कैथल जिल्ह्यातल्या खेडी गुलाम अली या गावात राहतात. ते भारतीय जनता पक्षाचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत. याआधी ते भाजपाचे मंडळ अध्यक्षही होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. सध्या त्यांचे वय ५५ वर्षे आहे. त्यांनी सांगितले की, वयाच्या १८ व्या वर्षी मतदार झाल्यानंतर ते नेहमीच मतदान करत आले आहेत. देशहितासाठी काम करणाऱ्या पक्षालाच त्यांनी नेहमी मत दिले आहे.
रामलाल कश्यप यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण राहील. मोदींना भेटण्यासाठी त्यांनी भाजपाचे माजी आमदार कुलवंत राम बाजीगर यांना पत्र लिहून आपली शपथ आणि कामकाजाची माहिती दिली होती.यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी हरियाणामधील दौऱ्याच्या वेळी मोदी आणि रामलाल कश्यप यांची भेट घडवून आणण्यासाठी विशेष नियोजन केले.