Udhav Thackeray: विधानसेभत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची (Udhav Thackeray)साथ सोडत शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे चिंतेत आहेत. त्यातच त्यांना कोल्हापूरमधून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आज (दि.१५ एप्रिल रोजी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीश घाटगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. या वेळी घाटगे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे, कारण संजयबाबा घाटगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठे राजकीय नाव आहे.
घाटगे यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, “संजयबाबा घाटगे यांच्या प्रवेशामुळे भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात अधिक बळ मिळेल. त्यांच्या अनुभवाचा आणि राजकीय ज्ञानाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.”
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. कारण कोल्हापूरमध्ये घाटगे यांचे राजकीय वर्चस्व आहे. त्यातच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि मुंबईच्या माजी नगरसेविका संजना घाडी आणि त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आहिल्यानगरमधील शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनीही नुकताच शिवसेनेक प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरेंना जड जाणार आहेत हे तर निश्चित मानले जात आहे.