नाशिकमध्ये काठे गल्ली परिसरात एका अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम तोडण्यासाठी (मंगळवारी) पहाटेपासून काम सुरू झाले आहे. मात्र, त्याआधी सोमवारी रात्रीपासूनच काही लोकांनी या कारवाईला विरोध केला आहे. वस्तुतः ही कारवाई न्यायालयाच्या आदेशावर आधारित होती, मात्र जमावाने ती थांबवण्यासाठी मोठा विरोध केल्याने हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली.ज्यामध्ये पोलीसही जखमी झाले आहेत.
दगडफेक आणि तोडफोड
कारवाईच्या आधी रात्रीच्या वेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, तसेच काही गाड्यांची तोडफोडही केली. या दगडफेकीत 31 पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतलं असून 57 संशयित मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
पोलिसांचा बंदोबस्त आणि सौम्य कारवाई
रात्री 500 पोलिसांचा बंदोबस्त होता, कारण जमाव 400 पेक्षा जास्त होता. जमावाला थांबवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे. तसेच पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. शिवाय पोलिसांकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आश्वासन देण्यात आले आहे.
प्रशासनाची कारवाई आणि नोटीस
पालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिल रोजी दर्ग्याला नोटीस दिली होती “अनधिकृत बांधकाम तुम्हीच काढा, नाहीतर प्रशासन कारवाई करेल.” त्यानुसार तोडकाम सुरू करण्यात आलं आहे.
अफवा आणि तणाव
या हिंसाचारादरम्यान वीजपुरवठा बंद होता, ज्याचा गैरफायदा घेत जमावाने अचानक हल्ला केला. तसेच अफवांचा मोठा प्रसार झाल्यामुळे वातावरण अजूनच तणावपूर्ण बनले होते. आता या भागातील वाहतूक मार्ग बदलण्यात आले असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.