Ladaki Bahin Yojana: महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी महिलांना दर महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे १५०० रूपये वरून २१०० रूपये कधीपासून मिळतील याकडे महिलांचे लक्ष लागले असतानाच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
आता ज्या महिलांना ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा लाभ मिळतो अशा महिलांना लाडकी बहीण योजनेद्वारे केवळ ५०० रूपये दिले जाणार आहेत. जवळपास ८ लाख महिलांना यापुढे १५०० ऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. अर्थातच नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांची लाडकी बहिण योजनेची रक्कम कमी करण्यात आली आहे.
याबाबत महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सविस्तर खुलासा केला आहे. तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या महिलांना दोन्ही योजनांचा पूर्ण लाभ देता येत नसल्याने शासनाच्या पूर्वीच्या निर्णयानुसारच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कुठलाही नवीन घोळ किंवा गोंधळ झालेला नाही.
दरम्यान, विरोधी पक्षांनी या रकमेवरून सरकारवर जोरदार टीका करत ही योजना महिलांची फसवणूक असल्याचे म्हटले आहे. मात्र तटकरे यांनी दरमहिना स्थिर सन्मान निधी देण्याचा उद्देश कायम ठेवण्यात आलेला असून शासन धोरणात कोणताही गोंधळ नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नमो शेतकरी सन्मान योजनेचे एक हजार रूपये आणि लाडकी बहीण योजनेचे ५०० असे मिळून १५०० रूपये महिलांना मिळणार आहेत.