China India : नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील चिनी दूतावासाने १ जानेवारी ते ९ एप्रिल २०२५ दरम्यान भारतीय नागरिकांना ८५,००० हून अधिक व्हिसा जारी केले आहेत. ही आकडेवारी पाहता भारत-चीन देशांमधील संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. एवढेच नाही तर भारत आणि चीनमधील प्रवास सुरळीत करण्यासाठी चीन सरकारने भारताला अनेक सवलती दिल्या आहेत.
चीन भारताशी मैत्री वाढवतेय अशा चर्चा का रंगल्या आहेत:
– नुकतेच चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांनी भारत-चीन आर्थिक आणि व्यापारी संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “चीन-भारत आर्थिक आणि व्यापारी संबंध पूरकता आणि परस्पर फायद्यावर आधारित आहेत. अमेरिकेकडून शुल्काच्या गैरवापराचा सामना करत असताना दोन सर्वात मोठ्या विकसनशील देशांनी अडचणींवर मात करण्यासाठी एकत्र उभे राहिले पाहिजे.” अर्थातच यावरून चीनला भारताशी व्यापारीक संबंध वाढवायचे आहेत हे स्पष्ट होते.
– चीनने भारताला व्हिसा जारी करण्याच्या प्रमाणात झालेली वाढ अधोरेखीत करणे म्हणजे भारत आणि चीनमधील सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यवसाय आणि पर्यटन देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी चीनने दाखवून दिलेला एक प्रयत्न आहे.
– गेल्या अनेक वर्षांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. मात्र या तणावाला पूर्णविराम देण्यासाठी आणि सीमेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांकडून संवाद आणि मुत्सद्देगिरीचे प्रयत्न सुरू आहेत.
अमेरीकेशी संबंध बिघडले असताना चीनला भारताशी मैत्री करणे कसे फायद्याचे ठरू शकते:
– चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात निर्यातीवर आधारित आहे आणि अमेरिका हे त्याचे सर्वात मोठे बाजारपेठ आहे. परंतु सध्या अमेरिकचे आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. अमेरीका चीनला त्यांच्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याची धमकी देत आहे. अशा परिस्थीतीत भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेशी मैत्री केल्यास चीनला निर्यातीसाठी एक चांगला पर्याय मिळू शकतो आणि अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करता येऊ शकते.
-अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि भारताला एक महत्त्वाचा भागीदार मानतो. पण चीनला या वाढत्या अमेरिकन प्रभावाला संतुलित करायचे असल्यास भारताशी चांगले संबंध ठेवणे महत्त्वाचे वाटू शकते, अशा चर्चा आहेत.
– चीन आशियामध्ये आपले नेतृत्व प्रस्थापित करू पाहत आहे. अशातच भारतासारख्या मोठ्या लोकशाही आणि आर्थिक शक्तीला सोबत घेतल्यास चीनला आशियामध्ये अधिक प्रभावी भूमिका बजावता येईल आणि प्रादेशिक स्तरावर स्थिरता आणि विकास साधता येतो.
– अमेरिकेशी बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतासोबत समन्वय साधल्यास चीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका अधिक प्रभावीपणे मांडता येऊ शकते. कारण भारत हा मोठी लोकशाही आणि आर्थिक व्यवस्था मोठा असलेला देश आहे.
-एकंदरित चीन आणि अमेरिकेचे संबंध बिघडलेले असताना चीनला भारताशी मैत्री करणे अनेक अंगानी फायद्याचे आहे. त्यामुळे चीनला केवळ आर्थिक आणि भू-राजकीय फायदेच मिळणार नाहीत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्थिती मजबूत करण्यासाठीही भारताची मोठी मदत मिळू शकते, त्या दृष्टिकोणातून चीन भारताशी मैत्री प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकते.