Narendra Modi: आपण जाणतोच की आंब्याच्या हापूस, केसर, मांकुराद, पायरी अशा कित्येक विविध जाती आहेत.आंब्याच्या याच विविध जाती आणि उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. 30 एप्रिलपासू 1 मे असे दोन दिवस आंबा मोहत्सव असणार आहे.
हा महोत्सवामध्ये भारतातील प्रमुख आंबा उत्पादक राज्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याकडील उत्कृष्ट जातीचे आंबे प्रदर्शित करणार आहेत. महाराष्ट्राचा हापूस, उत्तर प्रदेशचा दशहरी, कर्नाटकाचा बादामी, बिहारचा जर्दालू यांसारख्या प्रसिद्ध जाती या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. त्यामुळे आता दिल्लीकरांना विविध जातींच्या आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.
या महोत्सवाचा मुख्य उद्देश भारतीय आंब्याची गुणवत्ता आणि चव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महोत्सवात आंब्यापासून तयार केलेले विविध पदार्थ जसे की लोणचे, ज्यूस, जाम आणि बर्फी यांचेही प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. यासोबतच आंब्यांवर आधारित पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन या मोहत्सवात केले जाणार आहे.
हा आंबा महोत्सव मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांनी त्यांच्या संकल्पनेतून आयोजित केला आहे. रवींद्र वायकर यांनी महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावे, यासाठी मोदींची भेट घेऊन आंबा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मोदींचे वेळ घेतली आहे. या महोत्सवाला काही केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यांतील खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत.