Puja Khedkar Case: वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण २१ एप्रिल २०२५ पर्यंत वाढवले आहे. पूजा खेडकरवर २०२० च्या यूपीएससी(UPSC) परीक्षेत इतर मागासवर्गीय आणि बेंचमार्क डिसेबिलिटीज असलेल्या व्यक्तींसाठी असलेले आरक्षण फसवणूक करून वापरल्याचा आरोप आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी ठेवली आहे.
नेमके पूजा खेडकरचे कोठडी प्रकरण काय आहे:
काही महिन्यांपूर्वी दिल्ली पोलिसांची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, बनावट कागदपत्रांच्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पूजा खेडकरला कोठडीत ठेवून चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यावर खेडकरला बनावट प्रमाणपत्रे मिळविलेला स्रोत उघड करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. परंतु त्यासाठी खेडकरला पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते. दरम्यान जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देत तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे.
विशेष म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. केवळ घटनात्मक संस्थेसोबतच नव्हे तर समाज आणि संपूर्ण देशाच्या फसवणुकीचे उत्कृष्ट उदाहरण असल्याची टिप्पणी दिल्ली खंडपीठाने केली होती. त्यानंतर खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तिला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचे हे अंतरिम संरक्षण कायम ठेवत खेडकरने जबाब दाखल केला आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला दिले आहेत. त्यामुळे तुर्तास पूजा खेडकरला २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.