पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी वक्फ सुधारणा कायद्यावरून मुर्शिदाबादमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचं जाहीर केलं आहे. कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी यासंबंधित माहिती दिली.
यावेळी मनात बॅनर्जी म्हणाल्या, की मी मुख्य सचिवांकडून याबद्दल अहवाल मागवेल. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये मिळतील. आम्हाला पीडितांची धार्मिक ओळख दिसत नाही तर त्यांचे दुःख दिसते. ज्यांनी आपली घरे गमावली आहेत त्यांना बांगला बारी (त्यांच्या सरकारद्वारे पूर्णपणे निधी दिलेली घर योजना) मिळेल.
पुढे त्या म्हणाल्या, ज्यांच्या दुकानांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी अहवाल बनवतील आणि त्यांचे काम पूर्ण करतील.’
पश्चिम बंगालमध्ये ११ एप्रिल रोजी, वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात ठीक-ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पण मुर्शिदाबादमधील निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ, दंगल, दगफेक झाली. ज्यामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत १५० लोकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अजूनही समसेरगंज, धुलियान आणि मुर्शिदाबादच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथील परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून, पोलीस याठिकाणी २४ तास तैनात आहेत. पोलिसांसोबत बीएसएफ जवान देखील तैनात आहेत.
दरम्यान, भाजपने तृणमूल काँग्रेसवर निदर्शकांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत ममता बॅनर्जी इच्छित नाहीत तोपर्यंत राज्यातील हिंसाचाराच्या घटना कमी होणार नाहीत. असे वक्तव्य पश्चिम बंगाल भाजप युनिटचे अध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार दोन दिवसांपूर्वी केले आहे.