ATM In Train: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. आता प्रवाशांना त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. अर्थातच भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या या खास उपक्रमामुळे धावत्या ट्रेनमध्येही प्रवाशांना पैसे काढता येणार आहेत. सध्या या सुविधेची चाचणी सुरु असून मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एक एटीएम मशीन लावण्यात आले आहे.
एटीएमची ही सुविधा धावत्या ट्रेनमध्ये काम करते की नाही, याची तपासणी रेल्वेचे अधिकारी करत आहेत. नेटवर्क कनेक्टिव्हिटी, सिक्युरिटी, प्रायव्हसी यासह इतर गोष्टींची चाचपणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जात आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली तर पुढे इतर अनेक ट्रेन्समध्ये एटीएमची सुविधा पुरवली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना झटपट कॅश काढणे सोपे होणार आहे.
In a first, ATM facility in train. pic.twitter.com/onTHy8lxkd
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 16, 2025
पंचवटी एक्सप्रेस ही दररोज मुंबई ते नाशिकदरम्यान धावणारी लोकप्रिय इंटरसिटी ट्रेन आहे. या ट्रेन अंतर्गत मुंबई ते नाशिक प्रवासासाठी ४ तास ३५ मिनिटे लागतात. या ट्रेनने दररोज हजारो प्रवाशी ये-जा करत असतात. त्यामुळे ही ट्रेन प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. ही लोकप्रियता लक्षात घेताच याची उपक्रमाची सुरुवात मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे.
दरम्यान, पंटवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम कोचच्या मागील बाजूस बसवण्यात आले आहे, यापूर्वी या कोचचा वापर तात्पुरता पॅन्ट्री म्हणून केला जात होता. धावत्या गाडीत एटीएमच्या सुरक्षेसाठी मजबूत शटर दरवाजाही देण्यात आला आहे. यासाठीचे आवश्यक सर्व मॉडिफिकेशन किंवा डब्याचे सुधारकाम मनमाड रेल्वे कार्यशाळेत करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. या प्रयोग यशस्वी ठरल्यास प्रवाशांना प्रवासात पैशांची गरज भासल्यास मोठी सोय होणार आहे.