shivraj Rakshe: महाराष्ट्र केसरीची ६७ वी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान झाली होती. अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती झाली होती. मात्र पंच नीतेश काबलिया यांनी राक्षे चीतपट झाल्याचा निर्णय दिला होता आणि पृथ्वीराज मोहोळला ६७ वा महाराष्ट्र केसरी जाहीर केले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी कुस्ती खेळण्यास निलंबित करण्यात आले होते.
आता मात्र कुस्तीपटू शिवराज राक्षे याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने त्याच्यावर घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे शिवराजला पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच तो कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्धकांना आव्हान देताना दिसणार आहे. त्याच्या पुनरागमनामुळे कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महासंघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वेळी झालेल्या वादाची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालात मल्ल शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यावर घातलेली तीन वर्षांची बंदी उठवण्यात आली आहे आणि पंच नीतेश काबलिया यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे महाराष्ट्र कुस्ती महासंघाने पारदर्शकतेचा आणि न्यायप्रियतेचा संदेश दिला आहे. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या मल्लाचे करिअर धोक्यात येऊ शकते आणि एखाद्या मल्लाचे इतके मोठे नुकसान होऊ शकते याचे गांभीर्य पंचांनी बाळगले पाहीजे, अशा भावना आता व्यक्त होत आहेत.