जिथे जमिनीचे संपादन होणार आहे, तेथील जमीन शेतकऱ्यांनी विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडले नाही पाहिजे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले. तुमची जमीन कोणता व्यक्ती विकत घेतो आहे. त्याला जमीन कोणत्या कामासाठी हवी आहे? या गोष्टींची माहिती करून घ्या. कारण जमिनीचा पैसा हा थेट शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. असेही मुख्यामंत्री पुढे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
आम्ही जमिन अधिग्रहणाची घोषणा केली की कोणीतरी पैसावाला येतो आणि शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतो. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या या जमिनीतून तो पाच पट पैसे कमावतो. त्यामुळे, ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण होतोय, त्याठिकाणी तुम्ही जमिनी विकू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर माहित घ्या हा जमीन का घेतोय. कारण, शेतकऱ्यांना पैसे मिळावे, व्यापाऱ्यांना नको, अशी आमची भावना आहे, असे म्हणत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद फडणवीसांनी महत्त्वाचं आवाहन केले आहे. प्रकल्पग्रस्त सगळ्या शेतकऱ्यांना येत्या काळात पैसे मिळतील, कोणीही आलं तर तुम्ही थेट कार्यालयात जा, पण दलालांच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला देखील फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
पुढे काँग्रेसवर टीका करत फडणवीस म्हणाले, 2006 ते 2013 च्या काळात येथील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. सर्व प्रकारचे हक्क गोठवण्याचे काम झाले, कोणाला एक लाखाचा भाव देऊन हक्क गोठवण्याचे काम झाले. मग मी मुख्यमंत्री झालो तेव्हा नवीन जीआर काढला आणि थेट खरेदी सुरू केली. मग अनेकांना कळलं की आमची फसवणूक झाली आहे. सुरुवातीच्या काळात अनेक बैठका झाल्या, त्या लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. मग, युतीचं सरकार आलं तेव्हा अनेक आंदोलनंही झाले, काही आत्महत्याही झाल्याचा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.
LIVE | विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप#Maharashtra #Amravati #VidarbhaFarmers
🕞 दु. ३.२२ वा. | १६-४-२०२५📍अमरावती. https://t.co/olyZYIToCK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 16, 2025
पुढे, 2006 ते 2013 या काळात थेट पद्धतीने शासनाला जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना 832 कोटी रुपयांच्या वाढीव मोबदल्याचे वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 5 लाख रुपये मिळणार असून ही रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल. असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.