प्रसिद्ध अमेरिकन मासिक टाईमने २०२५ सालासाठी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत जगातील अनेक मान्यवर नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, यंदाच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत फक्त एका भारतीयाला स्थान मिळाले आहे.
यामध्ये रेश्मा केवलरमानी या एकमेव भारतीय महिलेचा समावेश आहे. रेश्मा यांचे नाव यादीत आल्याने अनेक जण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करत आहेत. अशातच आजच्या या बातमीत आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
कोण आहेत रेश्मा केवलरमानी?
रेश्मा केवलरमानी या अमेरिकेतील बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘Vertex Pharmaceuticals’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘टाइम’ मॅगेझीनच्या यादीत समाविष्ट झालेल्या त्या एकमेव भारतीय वंशाच्या महिला आहेत. रेश्मा यांचा मुंबईत जन्म झाला आहे. त्या १९८८ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी अमेरिकेत गेल्या. नंतर त्यांनी तिथे वैद्यकशास्त्र आणि वैज्ञानिक संशोधनात करिअर केले. त्यांनी बोस्टन विद्यापीठात वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केला. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधून फेलोशिप घेतल्यानंतर. २०१५ मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून जनरल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली.
दोन वर्षांत कंपनीच्या सीईओ
टाईम मासिकाच्या मते, २०१८ मध्ये रेशमा व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्समध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. २०२० मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. रेशमा केवलरामणी यांच्या नेतृत्वाखाली व्हर्टेक्सने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पहिल्यांदाच CRISPR तंत्रज्ञानावर आधारित सिकल सेल आजारावर उपचार करणाऱ्या औषधाला मान्यता दिली. रेशमा अमेरिकेच्या ‘Ginkgo Bioworks’ या बायोटेक कंपनीच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहेत.
टाईमने या यादीत ३२ देशांतील लोकांचा समावेश केला आहे. यामध्ये राजकारणी, कॉर्पोरेट सीईओ, खेळाडू, कलाकार आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. याशिवाय ट्रम्प प्रशासनातील सहा जण आहेत. तसेच यादीत एकूण १६ सीईओ आहेत.
सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध करणारे ‘टाइम’ मासिकाचे मुख्य संपादक सॅम जेकब्स यांनी प्रभावशाली व्यक्तीची यादी सादर होताच प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, ‘यादीतील लोकांचे विचार आणि कार्य जगाला पुढे घेऊन जात आहेत. या यादीत समावेश करण्यात आलेले व्यक्ती त्यांच्या प्रसिद्धी किंवा संपत्तीमुळे मोठे नाहीत पण त्यांचा प्रभाव त्यांना चांगला बनवतो.’