आज जगभर पाकिस्तानची ओळख ‘दहशतवादाचं केंद्र’ अशी झाली आहे. त्यांनी स्वतः पेटवलेली आग आता त्यांच्या अंगावर येतेय. तरीही तिथले नेते किंवा लष्कर जे खऱ्या अर्थाने तिथलं राज्य चालवतं अजूनही सुधारणार वाटत नाहीत. भारताविरुद्ध राग आणि धार्मिक कट्टरतेचं बीज ते लोक अजूनही आपल्या जनतेच्या, विशेषतः मुलांच्या, मनात पेरत आहेत.
अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या एका कार्यक्रमात भाषण केलं. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीविषयी बोलताना हिंदूंविरुद्ध चिथावणीखोर विधानं केली. ते म्हणाले की, पाकिस्तानची सुरुवातच या विचारांवर झाली की “आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म, पद्धती, परंपरा आणि विचार सगळं वेगळं आहे.” यावरच द्विराष्ट्रवादाचं (Two Nation Theory) तत्व आधारलेलं होतं.
मुनीर पुढं म्हणाले की, “आपण एकच देश नव्हे, दोन वेगवेगळे देश आहोत. म्हणूनच आमच्या पूर्वजांनी पाकिस्तानसाठी लढा दिला, त्याग केला.” ते म्हणाले की ही गोष्ट पुढच्या पिढीला विसरता कामा नये आणि ती त्यांना सांगायला हवी, जेणेकरून त्यांचं पाकिस्तानशी नातं मजबूत राहील.
त्यांच्या मते, इतिहासात केवळ दोन देश असे आहेत जे धर्माच्या आधारावर बनले पहिले ‘रियासत-ए-तैयबा’ आणि दुसरं पाकिस्तान.याआधीही, १८ मार्च रोजी मुनीर यांनी असं म्हटलं होतं की पाकिस्तानला ‘कणखर देश’ (Hard State) बनवण्याची गरज आहे आणि दहशतवादाविरुद्धची लढाई ही त्यांच्या देशाच्या अस्तित्वाची लढाई आहे.
खरतर अशा प्रकारच्या वक्तव्याने पाकीस्तान अंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अशा चिथावणीखोर विधानांमुळे पाकिस्तानची “दहशतवाद पोसणारा देश”अशी प्रतिमा अधिक बळकट होत आहे. यामुळे देशांतर्गत धार्मिक कट्टरतेला चालना मिळू शकते. कारण हे विचार मुलांमध्ये कट्टरता रुजवतात. अशाने भविष्यातील पिढ्यांमध्ये सहिष्णुतेऐवजी द्वेष वाढू शकतो. ज्याचा फटका सामान्य माणसाला शिक्षण, व्यवसाय, रोजगार या गोष्टींमध्ये बसत असतो.