अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी (FSU) मध्ये काल गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीने ट्विट करून माहिती दिली आहे.
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, या गोळीबाराच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या गोळीबारातील एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे.
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीचे पोलिस प्रमुख जेसन ट्रम्बॉवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या गोळीबारात एका उच्चअधिकाऱ्याचा २० वर्षीय मुलगा देखील आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणाने गोळीबारासाठी त्याच्या आईच्या बंदुकीचा वापर केला आहे.’
गुरुवारी दुपारी फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ही घटना घडली तेव्हा सगळीकडे गोंधळ उडाला. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ अलर्ट जारी केला. त्यानंतर कायदा अंमलबजावणी संस्थांकडून रुग्णवाहिका, अग्निशमन गाड्या, पोलिसांच्या गाड्या तातडीने विद्यापीठाकडे रवाना झाल्या आणि युनिव्हर्सिटीमधील परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली.
या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करत दुःख व्यक्त केल आहे. “ही एक अतिशय दुःखद घटना आहे. दुर्दैवाने, अशा घटना घडत राहतात,” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेनंतर फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी कॅम्पस बंद करण्यात आले आहे.