पाकिस्तानमध्ये सध्या दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार लष्करी कारवाया सुरू आहेत. अलीकडेच, पाकिस्तानी लष्कराने खैबर पख्तूनख्वा या वायव्य भागात एक मोठी कारवाई केली. डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील मद्दी या ठिकाणी लष्कराने गुप्त माहितीच्या आधारे दहशतवाद्यांवर कारवाई केली. या कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, या गोळीबारात एक पाकिस्तानी जवानही शहीद झाला.
या कारवाईत दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण शोधून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आता हे काही पहिलेच प्रकरण आहे असे नाही. यापूर्वीही पाकिस्तानने अशाच प्रकारे उत्तर वझिरीस्तानमध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर आठ दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यामध्ये चार दहशतवादी जखमीही झाले होते. बलुचिस्तानमध्ये झालेल्या ट्रेन अपहरणाच्या घटनेनंतर पाकिस्तान सरकार आणि लष्कर दहशतवाद्यांविरुद्ध अधिक कठोर पावले उचलत आहेत.
या घटनेवरून पाकिस्तानमध्ये दहशतवाद अजूनही एक मोठा धोका असल्याचे दिसून प्रकर्षाने दिसून येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढल्यामुळे आणि देशांतर्गत अस्थिरतेमुळे पाकिस्तान सरकार आणि लष्कर आता अधिक आक्रमक धोरण स्वीकारत आहेत.या कारवायांनी तात्पुरता परिणाम होईल, पण जर दहशतवाद्यांच्या मूळ समस्यांकडे लक्ष दिलं नाही, तर ही लढाई दीर्घकालीन चालण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आणि लष्कराचा वाढता प्रभाव या गोष्टीही दहशतवादविरोधी प्रयत्नांना वेगळं वळण देऊ शकतात.