संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत जगातील पहिल्या क्रमांकाची लष्करी शक्ती म्हणून उदयास येईल. अशा विश्वास व्यक्त केला आहे. यावर्षी देशाचे संरक्षण उत्पादन १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे आणि २०२९ पर्यंत ३ लाख कोटी रुपयांची लष्करी उपकरणे तयार करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
संरक्षण प्रत्रकार परिषदेत बोलताना राजनाथ म्हणाले की, भारत संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करेल आणि संरक्षण औद्योगिक परिसंस्था निर्माण करेल. ही यंत्रणा केवळ देशाच्या गरजा पूर्ण करणार नाही तर संरक्षण निर्यात क्षमता देखील मजबूत करेल. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत एक विकसित देश म्हणून उदयास येईलच पण आपली लष्करी शक्ती देखील जगात अव्वल स्थानावर असेल.
राजनाथ सिंह म्हणाले, भारत केवळ आपल्या सीमा सुरक्षित करत नाही तर आंतरराष्ट्रीय संरक्षण परिसंस्थेत एक प्रमुख घटक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सर्वात मोठ्या प्राधान्यांपैकी एक म्हणजे संरक्षण क्षेत्राचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण आहे. सरकारसमोरील पहिले आणि सर्वात मोठे आव्हान म्हणजे भारत केवळ आपल्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठीच आयात करेल ही मानसिकता बदलणे आहे.
पुढे ते म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम केवळ देशाचे संरक्षण उत्पादन मजबूत करत नाही तर जागतिक संरक्षण पुरवठा साखळी लवचिक आणि मजबूत बनवण्याची क्षमता देखील त्यात आहे. भारताचे संरक्षण क्षेत्र स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वाटचाल करत असताना, जागतिक पुरवठा साखळ्यांना लवचिक बनवण्यात मोठी भूमिका बजावण्यासही मेक इन इंडिया कार्यक्रमाँचा वाटा मोठा आहे.