IPL Mumbai Indiance: यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशजनक राहिली आहे. नुकताच मुंबई इंडियन्सने १७ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादसोबत झालेल्या सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. यानिमित्ताने यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय नोंदवला गेला आहे. या विजयामुळे मुंबईच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या असल्या तरी मुंबई इंडियन्ससमोर काही आव्हाने असणार आहेत.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यापैकी केवळ ३ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे गुणतालिकेत मुंबई इंडियन्स सध्या सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईला जर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल त्यांना उर्वरित ७ सामन्यांपैकी किमान ६ सामने जिंकणे आवश्यक आहे. त्यातच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी होताना दिसत नाही.
मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी उर्वरित ७ सामन्यांपैकी किमान ६ मध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. परंतु ते ५ सामने जिंकले, तर त्यांचे १६ गुण होतील आणि इतर संघांच्या कामगिरीवर त्यांचे प्ले ऑफमधील स्थान अवलंबून राहील. कमी गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता असली तरी, त्यासाठी त्यांना आपला रन रेट सुधारावा लागेल आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ससारख्या मजबूत संघांविरुद्ध आहेत. त्यामुळे या संघांविरूद्ध चांगली कामगिरी करून विजय मिळवणे मुंबईसाठी आव्हान असणार आहे. दरम्यान फलंदाजी क्रम वेळोवेळी बदलणे, जसप्रीत बुमरा सामन्यांमध्ये नसणे आणि काही खेळाडूंकडून अपेक्षेप्रमाणे काम न होणे ही मुंबई इंडियन्सच्या पराभवाची कारणे सांगितली जात आहेत.