Rupali Chakankar:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत त्यांनी नुकताच पुणे जिल्ह्याचातीन दिवसीय दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आयोजित जनसुनावण्यांमधून एकूण ३०५ महिलांच्या तक्रारींचे निवारण केले आहे.
या जनसुनावण्यांमध्ये कौटुंबिक हिंसाचार, मालमत्ता वाद, फसवणूक, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, सायबर गुन्हे, विभक्त पती-पत्नीमधील तंटे अशा विविध प्रकारच्या ३२६ तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. यापैकी ३०५ प्रकरणांमध्ये समुपदेशन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने जागेवरच तोडगा काढण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान पोलीस, समुपदेशन विभाग, महिला व बालकल्याण, महसूल आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करतात.
रूपाली चाकणकर या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाल्या की, सामोपचाराने तंटे मिटवून कुटुंब व्यवस्था टिकवणे आणि मुलांचे भवितव्य सुरक्षित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. चाकणकर यांच्या या तीन दिवसीय दौऱ्यात पिंपरी-चिंचवड आयुक्तालय (मावळ, मुळशी, हवेलीसाठी – ४० प्रकरणे, पुणे जिल्हा परिषद, ग्रामीण भागासाठी – ४१ प्रकरणे, आणि पुणे शहरासाठी २२४ प्रकरणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुनावण्या घेऊन एकूण ३०५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महिलांना त्यांच्या तक्रारींसाठी मुंबईतील आयोगाच्या कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवला गेला होता. या अंतर्गत १५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जनसुनावण्या घेण्यात आल्या होत्या.