Tanisha Bhise: गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तनिषाचा मृत्यू झाल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीने दीनानाथ रूग्णालयाला दोषी ठरवले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांकडूनही ससून रूग्णालयाच्या वैद्यकीय तज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल १५ एप्रिल रोजी जाहीर होणार होता, परंतु हा अहवाल जाहीर करायला उशीर लागल्याने विविध चर्चांणा उधाण आले होते.
अखेर १८ एप्रिल रोजी ससूनचा अहवाला समोर आला आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केला आहे. या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलासा देण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांनादेखील क्लीन चिट मिळाली आहे. तसेच या अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालयावरती कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या अहवालानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या अहवालनंतर भाजप आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे की, ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल अर्धवट आहे. तसेच पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच दोषींवर गुन्हे दाखल होतील असा विश्वास गोरखे यांनी व्यक्त केला आहे. तसेच दीनानाथ रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे म्हणत याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. तसेच सुप्रिया सुळेंनी देखील हा अहवाल चुकीचा असून तो जाळून टाकला पाहीजे, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, धर्मादाय सह आयुक्त समितीचा अहवाल आणि शासनाच्या सार्वजनिकआरोग्य विभागाच्या अहवालात रूग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला असताना ससूनचा अहवाल मात्र वेगळा आल्याने आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार हा प्रश्न कसा हातळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.