Congress: काॅंग्रेस हा पक्ष एक राष्ट्रीय पक्ष असताना सुद्धा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात काॅंग्रेस डबघाईला आल्याचे चित्र आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी काॅंग्रेसचे पुण्यातील प्रमुख नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच सध्या काॅंग्रेसचे प्रमुख नेते संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. त्यातच काॅंग्रेसला आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
काॅंग्रेसचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे ज्यांनी आपल्या अखंड राजकीय आयुष्यात काँग्रेसचा विचार अखेरपर्यंत जोपासला ते साताऱ्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी सहकारमंत्री तसेच काँग्रेस या एकाच पक्षाचे व कराड दक्षिण या एकाच मतदारसंघातून सलग ३५ वर्षे आमदार राहिलेले कै.विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र आहेत.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाला कराड दक्षिणमध्ये दमदार नेतृत्व नव्हते. फार वर्षांपूर्वी शरद पवारांनी देखील विलासराव पाटील-उंडाळकर यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती नाकारली होती. परंतु उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचापक्षात प्रवेश होत असल्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळणार आहे. ॲड. उदयसिंह पाटील हे जिल्हा बँकेचे माजी संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि रयत कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत. कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उदयसिंह उंडाळकर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचा चेहरा असणार आहेत.
दरम्यान, अजित पवार आज कराड दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे २१ एप्रिल रोजी शरद पवारही सह्याद्री कारखान्यावरील विजयोत्सवाला येणार आहेत. काका-पुतण्याच्या या दौऱ्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.