श्रीलंकेने यावर्षी पाकिस्तानसोबत त्रिंकोमाली किनाऱ्याजवळ प्रस्तावित केलेला संयुक्त नौदल सराव रद्द केला आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला होता, कारण त्रिंकोमाली हा भाग भारतासाठी धोरणात्मक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. ही तीच जागा आहे जिथे भारत, श्रीलंका आणि युएई (UAE) मिळून एक ऊर्जा केंद्र उभारत आहेत. त्यामुळे भारताला वाटले की, अशा संवेदनशील भागात पाकिस्तानसोबत नौदल सराव होणं सुरक्षित नाही. भारताच्या या चिंतेनंतर श्रीलंकेने सराव रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारताची तीव्र प्रतिक्रिया
पाकिस्तानने या सरावाचा प्रस्ताव दिल्यानंतर, भारताने कोलंबोतील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. भारताने स्पष्ट सांगितले की, या भागात पाकिस्तानच्या लष्करी उपस्थितीमुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. भारताच्या मते, हा सराव म्हणजे भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न होता. यावर पाकिस्तानने विरोध केला, पण श्रीलंकेने शांततेत तो सराव रद्द केला.
चीन आणि पाकिस्तानमुळे भारताची काळजी
भारताला आधीपासूनच श्रीलंकेत चीन आणि पाकिस्तानच्या लष्करी हालचालींबद्दल चिंता वाटत होती. चीनने हंबनटोटा बंदर ९९ वर्षांसाठी भाड्याने घेतल्यानंतर तिथे चिनी युद्धनौकांची वर्दळ वाढली आहे. शिवाय, चीनची उन्नत तंत्रज्ञान असलेली पाळत ठेवणारी जहाजं श्रीलंकेत येत असल्यामुळे भारताला सुरक्षा धोक्याची जाणीव होते.या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेने गेल्या वर्षी एक वर्षासाठी परदेशी संशोधन जहाजांच्या भेटींवर बंदी घातली होती, विशेषतः चिनी जहाजांवर.
भारत-श्रीलंका संरक्षण करार
५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना, भारत आणि श्रीलंका यांच्यात ऐतिहासिक संरक्षण सहकार्य करार झाला. १९८० च्या दशकातील यादवी युद्धानंतर हे दोन्ही देशांमधील पहिले मोठे संरक्षण सहकार्य आहे. या करारामुळे संयुक्त लष्करी सराव, संरक्षण उत्पादन, आणि धोरणात्मक समन्वय वाढणार आहे.
त्रिपक्षीय ऊर्जा करार
त्याच दिवशी, भारत, श्रीलंका आणि युएई यांच्यात त्रिंकोमाली भागात ऊर्जा केंद्र उभारण्यासाठी करार झाला. यामध्ये पाइपलाइन आणि जुने तेल साठवण टाक्या (ज्या दुसऱ्या महायुद्धात वापरल्या जात होत्या) यांचे नूतनीकरण होणार आहे.या साठवण टाक्यांचा विकास इंडियन ऑइलच्या श्रीलंका युनिटने श्रीलंकेच्या कंपनीसोबत मिळून करायचा आहे. या प्रकल्पामुळे भारताची श्रीलंकेत ऊर्जा क्षेत्रातली उपस्थिती आणि धोरणात्मक ताकद वाढणार आहे.
खरतर श्रीलंकेने पाकिस्तानसोबतचा नौदल सराव रद्द करून भारताच्या सुरक्षेच्या चिंतेला मान दिला आहे. भारत-श्रीलंका यांचे संबंध आता अधिक मजबूत होत असून संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ही भागीदारी भारतासाठी खूप महत्त्वाची आहे.