राज्यात हिंदी शिकवणे सक्तीचे केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याला तीव्र विरोध दर्शवला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीनुसार राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली असून, याविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सरकारच्या धोरणावर सवाल उपस्थित केले आहेत.
राज ठाकरेंचा विरोध, भाजपचा समन्वयाचा प्रयत्न
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने हिंदी सक्तीविरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. मात्र, या मुद्द्यावरून तणाव वाढू नये म्हणून भाजपकडून समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात स्पष्ट केलं आहे की, “राज साहेब समजूतदार नेते आहेत. मी त्यांना भेटून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेण्याची विनंती करणार आहे.”
बावनकुळे यांचे स्पष्टीकरण
बावनकुळे म्हणाले की, “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, राजभाषा नाही. काल मी चुकून हिंदीला राजभाषा म्हटले, याबाबत मी दुरुस्ती करत आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “मराठी ही आमची अस्मितेची भाषा आहे. सर्व शासकीय कामकाज मराठीतूनच व्हावे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला आहे.”
बावनकुळे यांनी यावर अधिक प्रकाश टाकत सांगितले की, “हिंदी शिकणे आवश्यक आहे, कारण देशातील सुमारे 60 टक्के राज्यांमध्ये प्रशासन हिंदीतून चालते. देशात कुठेही गेलं तरी हिंदी उपयोगी पडते. त्यामुळे इतर भाषांचा आणि अस्मितांचा आदर राखत हिंदी शिकण्यात गैर काही नाही.” मात्र, त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून आंदोलन करणे किंवा लोकांना मारहाण करणे चुकीचे आहे.” त्यांनी संयमाने आणि संवादाने या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले.
मनसेचा स्पष्ट विरोध कायम
राज ठाकरे यांची भूमिका मात्र ठाम आहे. मनसेने हिंदीची सक्ती राज्यावर लादण्यास विरोध दर्शवला असून, हा मराठी अस्मितेवर आघात असल्याचा आरोप केला आहे. हिंदीचा समावेश असला तरी त्याची सक्ती राज्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेला धक्का देणारी असल्याचा मनसेचा आक्षेप आहे.
हिंदी शिकवण्याची सक्ती ही शिक्षण क्षेत्रातील एक मोठी घडामोड ठरली आहे. एकीकडे केंद्राचे शैक्षणिक धोरण आणि दुसरीकडे राज्याची भाषिक अस्मिता यामध्ये संतुलन साधणे हे मोठे आव्हान ठरत आहे. आता राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची होणारी भेट कोणता तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.