Samrudhi Highway:नुकताच बुलढाणा जिल्ह्यात एक मोठा अपघात घडल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यात समृद्धी महामार्गावरील मेहकर नजीक नागपूर कॉरिडॉर वरच्या चेनेज 268 जवळ भीषण अपघात झाला होता. हा अपघात कार आणि ट्रकचा झाला होता. कार पुण्याहून वाशिमकडे जात असताना कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने अनियंत्रित कार समोर जात असलेल्या ट्रकला धडकून हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु समृद्धी महामार्गावर असा मोठा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकजण या अपघातांना सरकारला जबाबदार धरत असतात. परंतु नेमके आतापर्यंत झालेले अपघात कोणकोणत्या कारणामुळे झाले आहेत. याचा आढावा आपण घेऊयात.
समृद्धी महामार्गावर अपघात होण्याची अनेक कारणे आहेत.
– सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना वेगाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
नियमांनुसार, हलक्या मोटार वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा ताशी १२० किलोमीटर आहे. अवजड वाहनांसाठी ही मर्यादा ताशी १०० किलोमीटर आहे. त्या वेगाचे पालन करणे बंधनकारक आहे, परंतु अनेक वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करतात. त्यामुळे अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते.
-विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग लांबचा आणि एकसारखा रस्ता असल्याने चालकांना डुलकी येण्याची अर्थातच झोप लागण्याची शक्यता असते. अशावेळी चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.
-अनेक चालक लेन बदलताना नियमांचे योग्य पालन करत नाहीत, ज्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होतो आणि अपघात होतात, अशी माहिती देखील अनेकदा समोर आली आहे
समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानेअनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा वापर, जागोजागी रबरचे गतिरोधक बसवणे आणि चालकांसाठी जनजागृती करणे इत्यादी उपक्रमांचा यात समावेश आहे. वाहन चालकांना विश्रांती मिळत नाही आणि दूरवर असलेल्या रस्त्यांवर अन्य काहीही नसल्याने वाहकांना वेगावर नियंत्रण ठेवता येत नाही. तसेच रस्त्यावर तोच तोचपणा आल्याने वाहकांना एक प्रकारचा बधिरपणा येतो आणि त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अतिवेगामुळे अपघात होत असतात त्यामुळे महामार्गावर काही अंतरावर विश्रांती थांबे तयार करणे आवश्यक आहे, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत