Rajeshwari Kharat: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅण्ड्री’ या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात लोकप्रिय झाली. राजेश्वरी अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री राजेश्वरी खरात चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण तिने नुकताच ख्रिश्चन धर्मातील ‘बाप्तिस्मा’ हा विधी पूर्ण केला आहे.
राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती दिली आहे. त्या फोटोत ती पाण्यात उभी असून, तिने हात जोडलेले दिसत आहेत. या चित्रासोबत तिने ‘बाप्तिस्मा स्वीकारला असे लिहिले आहे.
याशिवाय तिने एक ग्रुप फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहे. हॅशटॅगमध्ये तिने ‘नवीन सुरूवात’ असे लिहले आहे. अर्थातच तिने बाप्तिस्मा स्वीकारल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, राजेश्वरीच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया येत असून अनेकांनी तिच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. तसेच तिने धर्मांतर केला असल्याचाही दावा केला. परंतु तिच्या या पोस्टच्या विरूद्ध कमेंट करणाऱ्यांना तिने फेसबुक पोस्ट करत सुनावले आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निवडणुका, प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण, आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे, हे आज धर्म/जात शिकवायला आले आहेत, तुमचे स्वागत आहे. कोणी पैश्यांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे. टीप-माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे, आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती.”