अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ दिसून येत आहे. मंगळवारी दिल्लीच्या किरकोळ बाजारात सोन्याचे दर पहिल्यांदाच प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. तर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, २४ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी त्याची किंमत ९६६७० रुपये होती. म्हणजेच आज २४ कॅरेट सोने एका दिवसात प्रति १० ग्रॅम ३,३३० रुपयांनी महाग झाले आहे. त्याचवेळी, आज चांदीचा दर प्रति किलो ९५,९०० रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याचे भाव वाढण्यामागची कारणे ?
-सोन्याच्या किमती वाढण्यामागे पहिले कारण म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ कर लादण्याची घोषणा आणि यामुळे निर्माण झालेला तणाव.
-टॅरिफमुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
-अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपानसारख्या मोठ्या देशांची अर्थव्यवस्था मंदावणे.
-बऱ्याच वर्षांनी डॉलरच्या किमती पडणे. ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ. डॉलर कमकुवत झाल्यावर सोन्याची किंमत अनेकदा वाढते.
-सोन्याच्या किमती वाढण्यामागील एक कारण म्हणजे मध्यवर्ती बँकांनी केलेली खरेदी. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी तयारी करत असताना जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या तीन वर्षांत १,००० टनांपेक्षा जास्त सोने खरेदी करणे.
-सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. मंदीची वाढती भीती, मंदावलेली वाढ आणि सततच्या व्यापार युद्धाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्ता खरेदी करत आहेत. ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत.