जम्मू-काश्मीर मधून मोठी बातमी समोर येत आहे. थोड्या वेळापूर्वी पहलगाम मधील बैसरन येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केले, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या दहशदवादी हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत, जखमी झालेल्या लोकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी पर्यटकांना धर्म विचारला असल्याचं समोर येत आहे. पर्यटकांनी हिंदू म्हणताच याठकाणी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यावेळी पर्यटकांना काही समजायला वेळ देखील मिळला नाही. अचानक झालेल्या गोळीबारात २६ लोकांचा मृत्यू झाला असून, यात पहलगाम येथे फिरायला आलेल्या दोन जवानांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळत आहे.
या हल्ल्यानंतर दहशदवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. सीआरपीएफची क्विक अॅक्शन टास्क फोर्स देखील दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, या दहशदवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झाले असून, परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्ली आणि मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांना पर्यटन स्थळे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी कडक नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर मुंबई पोलिसांनी व सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तसेच झोनल डीसीएसपींना त्यांच्या भागात अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या अमित शाह श्रीनगरमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि उच्च सुरक्षा अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.
https://x.com/ANI/status/1914705617098346982
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, ‘ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. या भयानक हल्ल्यामागे जो कोणी असेल त्याला शिक्षा होईल. त्यांना सोडले जाणार नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईची आमची वचनबद्धता अढळ आहे आणि ती आणखी मजबूत होईल.’
https://x.com/narendramodi/status/1914665856799302066
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच पंतप्रधानांनी शहा यांना योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.