जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात आणि जगात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक मारले गेले असून बरेच लोक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भारत सरकारने तातडीने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गृहमंत्री अमित शहा लगेच काश्मीरला पोहोचले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील तत्परता दाखवत सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला.
अमेरिका आणि इतर देशांचा पाठिंबा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांसाठी शोक व्यक्त केला. त्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि सांगितले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारताच्या सोबत आहे.आणि या लढ्यात आवश्यक ती संपूर्ण मदत करण्यासाठी तयार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले आणि सांगितले की “हल्लेखोर आणि त्यांना मदत करणारे यांना कठोर शिक्षा होईल”. या संवादातून भारताला अंतरराष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाचा राजकीय पाठिंबा मिळाला आहे. भारत-अमेरिका संबंधांमधील ही जवळीक, जागतिक स्तरावर भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला अधिक बळकटी देईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही या हल्ल्यावर दुःख व्यक्त करत भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन दिले आहे. इस्रायलनेदेखील आपला पाठिंबा दर्शवला आहे.
पहलगामढील ही घटना देशासाठी खूपच दुखद आहे, पण त्याचवेळी जगभरातून भारताला मिळणारा पाठिंबा आश्वासक आहे. यामुळे भारताला दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाम भूमिका घेता येणार आहे. अमेरिका, रशिया आणि इस्रायलसारख्या जागतिक महासत्तांचा भारताला मिळणारा पाठिंबा, हे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक महत्त्वाचे शस्त्र आहे. भारताने आता केवळ संरक्षणात्मक भूमिका न घेता, कठोर प्रतिउत्तर देण्याची गरज ओळखली आहे. शेवटी, दहशतवाद्यांचा पराभव आणि देशात शांतता प्रस्थापित करणे हेच सर्वांचे अंतिम उद्दिष्ट असावे यात शंका नाही.