जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांच मृत्यू झाला, तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पहलगाम येथे झालेल्या या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
अशातच एक दिवसानंतर या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. टीआरएफ दहशतवादी संघटना काय आहे? ही दहशतवादी संघटना कोणाची देन आहे? कधी पासून ही संघटना सक्रिय आहे? सविस्तर जाणून घेऊया….
टीआरएफ संघटना काय आहे?
टीआरएफ (The Resistance Front) ही एक दहशतवादी संघटना आहे. जी खासकरून जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय आहे. ही संघटना भारत सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबा (LeT) या पाकिस्तानस्थित जिहादी दहशतवादी गटाची एक शाखा मानली जाते. भारतीय सरकारच्या मते, टीआरएफ लष्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन यांच्या कॅडरपासून तयार झाली आहे. ही संघटना सामान्य नागरिक, विशेषतः अल्पसंख्याक समुदाय (जसे काश्मिरी हिंदू), सरकारी कर्मचारी, स्थानिक राजकारणी, पर्यटक आणि भारतीय सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी ओळखली जाते.
टीआरएफ संघटना कधी अस्तित्वात आली?
ही संघटना ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवताच संपूर्ण काश्मीरमध्ये सक्रिय झाली. थोड्याच काळात या दहशतवादी संघटनेने जम्मू-कश्मीर मध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यापासून टीआरएफची ताकद वाढू लागली. काश्मीरमध्ये टीआरएफ सध्या सर्वात सक्रिय दहशतवादी गटांपैकी एक मानली जाते. काश्मीर मधील सर्व हल्ल्यांची जबाबदारी हीच संघटना घेते.
टीआरएफ कोणाची देन?
टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाची एक उपशाखा आहे आणि ती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) च्या मदतीने कार्य करते. या संघटनेची स्थापना लष्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन यांच्या सहकार्याने झाली असून, पाकिस्तानमधून तिचे नियंत्रण केले जाते. टीआरएफचा प्रमुख शेख सज्जाद गुल याला भारत सरकारने 2022 मध्ये बेकायदेशीर कारवाया अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. याच्याशिवाय साजिद जट, सज्जाद गुल आणि सलीम रहमानी यांसारखे लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेले नेते टीआरएफचे नेतृत्व करतात.
टीआरएफचा उद्देश लष्कर-ए-तैयबासारख्या गटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर टीकेचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांच्यासाठी पडदा म्हणून काम करतात. म्हणजेच लष्कर-ए-तैयबासारख्या संघटना या टीआरएफ सारख्या दहशतवादी गटांद्वारे आपला हेतू मागे बसून साध्य करतात.
यापूर्वी काश्मीरमध्ये हल्ले
टीआरएफने यापूर्वीही काश्मिरी पंडित, कामगार आणि पर्यटकांना लक्ष्य केले आहे. गंदरबल जिल्ह्यात, त्यांच्या दहशतवाद्यांनी एका बांधकाम स्थळावर हल्ला केला होता. त्यात एक डॉक्टर, कामगार आणि एका कंत्राटदारासह सात जणांची हत्या केली होती.