24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कानपूर दौरा ठरलेला होता. या दौऱ्यात ते सुमारे 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार होते. मात्र, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच २१ एप्रिल रोजी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूरला दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना वेळेवर आणि योग्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. योगी यांनी पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणीही भेट दिली होती. त्यांनी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण उपाय, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छता यासारख्या आवश्यक सुविधांचा आढावा घेतला होता.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात म्र्त्यू झालेल्यांपैकी कानपूरचा युवक शुभम याचाही समावेश आहे.त्यामुळे कानपूरमध्ये दुःखाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी कानपूरकरांच्या भावना लक्षात घेऊन, कोणताही सार्वजनिक उत्सव किंवा कार्यक्रम योग्य ठरणार नाही असे मानून हा दौरा रद्द केला आहे.
दरम्यान पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही या घटनेची तीव्र शब्दांत निंदा होत आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा देखील तात्काळ अर्धवट सोडला आणि दिल्लीला परतले.दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्यांनी तातडीची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव उपस्थित होते.
मोदींचा हा निर्णय राजकीय पेक्षा मानवी दृष्टिकोनातून अधिक महत्वाचा आहे. संकटाच्या वेळी देशाच्या प्रत्येक नागरिकासोबत उभे राहणे ही एका नेत्याची खरी ओळख असते, आणि मोदींनी या निर्णयातून ते दाखवून दिले आहे.