भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना ‘ISIS काश्मीर’ या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी त्यांच्याच एका कर्मचाऱ्याला ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती. २२ एप्रिल रोजी दुपारी २ ते ७ या वेळेत दोन ईमेल आले होते.
या ईमेलमुळे खळबळ उडाली असून, गंभीर यांनी दिल्लीतल्या राजेंद्र नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसांना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी पोलिस उपायुक्त आणि ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
ही धमकी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आली आहे. त्या हल्ल्यात हिंदू पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेबाबत गंभीर यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, अशा हल्ल्यांची जबाबदारी घेणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. याआधीही, नोव्हेंबर २०२१ मध्ये गौतम गंभीर यांना अशीच धमकी मिळाली होती, तेंव्हा ते खासदार होते.
https://x.com/ANI/status/1915242977993293850?t=fLEPYRoKFA0WKasUN6ViiQ&s=19
वस्तुतः गौतम गंभीर यांना मिळालेली जीवे मारण्याची धमकी ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, अशा प्रकारच्या धमक्या लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोकादायक ठरतात. गंभीर यांनी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व्यक्त केलेल्या मतांनंतरच ही धमकी मिळाल्यामुळे, हा प्रकार अधिक चिंताजनक आहे. सरकार आणि पोलिसांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तातडीने योग्य ती पावले उचलली आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक होईल अशी अपेक्षा आहे.