२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये सहा जण महाराष्ट्रातील होते. विशेष म्हणजे, या हल्लेखोरांनी लोकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला, ही गोष्ट अधिक धक्कादायक आहे.
या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे आणि लोक एकच मागणी करत आहेत ती म्हणजे भारत सरकारने पाकिस्तानकडून या हल्ल्याचा बदला घ्यावा. या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल रोजी नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने पाकिस्तानला कडक उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
विश्व हिंदू परिषदेचे नागपूर शहरप्रमुख अमोल ठाकरे यांनी सांगितले की, “या प्रकाराचा निषेध करण्यासाठी शब्दच उरत नाहीत. याआधीही काश्मीरमध्ये अशा घटना घडल्या आहेत, पण यावेळी धर्म विचारून गोळीबार केला गेला. जर असे होत असेल, तर हिंदू समाज गप्प बसणार नाही. आम्ही आता विटेला दगडाने उत्तर देण्यासाठी तयार आहोत.”
ते पुढे म्हणाले, “आमची मागणी आहे की पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रपती यांनी कठोर निर्णय घ्यावा. पाकिस्तानला अशी शिक्षा द्या की त्यांच्या पुढच्या ७० पिढ्यांना देखील हा धडा लक्षात राहील. जसे दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले तसे आता तिसऱ्यांदा आणखी मोठे पाऊल उचलावे आणि पाकिस्तानचा नकाशाच पुसून टाकावा. पाकिस्तानचे नावच नष्ट करावेअशी देशभरातील हिंदू समाजाची भावना आहे.”
पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला केवळ एका हिंसक घटनेपुरता मर्यादित न राहता, त्याने देशभरात भावनिक आणि सामाजिक प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत. धर्म विचारून केलेला हा हल्ला अधिक धक्कादायक ठरला असून, यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या हल्ल्याला सडेतोड उत्तर देतील अशी भावना व्यक्त होत आहे.