Pahalgam Terrorist Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहे. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना टार्गेट केल्याने संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. भारत सरकारने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानविरोधात पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातीलच एक महत्वपूर्ण निर्णय म्हणजे भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे.
काय आहे सिंधू जल करार:
– सिंधू जल करार हा १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला एक महत्त्वपूर्ण पाणी वाटप करार आहे.
– १९६० मध्ये कराची येथे भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांनी या करारावरती स्वाक्षरी केली होती.
– या करारानुसार, सिंधू नदी व तिच्या उपनद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्न सोडवण्यात आला होता.
– या करारानुसार पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या म्हणजेच बियास, रावी आणि सतलज या नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराचे पूर्ण अधिकार भारताला देण्यात आले आहेत.
– तर पश्चिमेकडे वाहणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराचे अधिकार पाकिस्तानला देण्यात आले होते.
– परंतु या करारानुसार पाकिस्तानचा अधिकार असलेल्या सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी भारत पिण्यासाठी, शेतीसाठी, विद्युत प्रकल्पांसाठी वापरू शकतो. पण भारताला या नद्यांचे पाणी आडवण्याचा अधिकार नाही.
-हा करार दोन्ही देशांमधील पाणी वाटपावरून होणारे संघर्ष टाळण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात आला होता.
दरम्यान, भारत पाकिस्तानचे संबंध अनेकदा ताणले गेले असतानाही हा करार टिकून राहिला होता. परंतु आता भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्यानंतर या कराराला स्थगिती दिल्याने पाकिस्तानाला पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.