Pahalgam Terrorist Attck: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. मात्र दौरा अपूर्ण सोडून पंतप्रधान तातडीने भारतात परतले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मोदींनी पाकिस्तानविरोधात महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
त्यातच आता मोदींनी बिहारमध्ये बोलताना दहशतवाद्यांना मोठा इशारा दिला आहे. आज मोदी म्हणाले आहेत की, “हल्लेखोरांना चोख उत्तर दिले जाईल. हल्लेखोरांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा हल्लेखोरांना दिली जाईल. दहशतवादाचा कणा मोडल्याशिवाय आपण थांबणार नाही. हल्ल्यामागील दहशतवाद्यांच्या आकांनाही सोडले जाणार नाही.”
“दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. कोट्यवधी देशवासी दुःखी आहेत. संपूर्ण राष्ट्र पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. सध्या उपचार घेत असलेल्या नागरिकांना बरे करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” असेही मोदी यावेळी म्हणाले. हा हल्ला भारताच्या आत्म्यावरती केल्यासारखा आहे. आता दहशतवाद्यांचे उर्वरित अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे, असेही मोदी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे की, या दहशतवादी हल्ल्यांचा बदला भारताकडून घेतला जाईल.
दरम्यान, यापूर्वी भारताने दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतला आहे. २०१६ मध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी जम्मू-कश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर हल्ला केला होता, तेव्हा त्या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याच्या स्पेशल फोर्सेसनी नियंत्रण रेषापार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी प्रशिक्षण तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारताने अनेक दहशतवादी मारले होते.
पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यावेळी बदला म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात देखील भारताने अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.