पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. मात्र, ते हा दौरा अर्ध्यात सोडून भारतात तातडीने परतले.
या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मोदींनी पाकिस्तानविरोधात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. बुधवारी या संबंधित एक बैठक पार पडली, या बैठकीत पाकिस्तानविरुद्ध मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे.
सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जोवर थांबत नाहीत तोवर दोन्ही देशांतील सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयांतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० वर आणली जाणार आहे.
अटारी-वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. तसेच तिथून प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना येत्या १ मेपर्यंत भारतातून पुन्हा त्यांच्या मायदेशात परतावे लागेल असा आदेश केंद्र सरकराने दिला आहे. तसेच पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संपर्काधिकाऱ्यांना एक आठवड्याच्या आत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या उच्चायुक्त कार्यालयांतील पाच सहायक कर्मचाऱ्यांनाही माघारी बोलाविण्याचा आदेश भारताने दिला आहे.
याचदरम्यान, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा वादग्रस्त विधान समोर आले आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या पंतप्रधानांनी भारताविरुद्ध एक भडकाऊ भाष्य करत पहलगामयेथील हल्ल्याचे समर्थन केले आहे तसेच हा हल्ला बलुचिस्तानात घडलेल्या घटनांचा बदला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) चे पंतप्रधान चौधरी अन्वारुल हक यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत म्हंटले आहे की, ‘मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे, रक्त सांडावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही. जर तुम्ही बलुचिस्तानात पाकिस्तानी लोकांचे रक्त सांडले तर तुम्हाला त्याची किंमत दिल्लीपासून काश्मीरपर्यंत चुकवावी लागेल.’
पुढे ते असंही म्हणाले की, ‘पीओकेचे सैनिक भूतकाळात अशा हल्ल्यांमध्ये सहभागी झाले आहेत व भविष्यात अधिक जोमाने सहभागी होतील. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, आम्ही मागे हटणार नाही.’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर पाऊलांनंतर पाकिस्तानने आता भारतासोबतचा व्यापार संपवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) बैठकीत हा निर्णय घेतला आहे. भारताने केलेल्या कारवायांमुळे पाकिस्तानने बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक आयोजित केली ज्यात भारताच्या निर्णयांवर चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केली. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्रही बंद केले आहे.
भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्याबद्दल पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली व म्हटले की, ‘पाणी अडवणे हे युद्धाचे कृत्य आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने भारताचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. तसेच इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या भारतीय लष्करी सल्लागारांना (लष्कर, नौदल आणि हवाई दल) ३० एप्रिलपर्यंत पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’
यासोबतच, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या दूतावासांमध्ये प्रत्येकी फक्त ३० अधिकारी काम करतील असा निर्णय घेण्यात आला आहे. भारताने सिंधू पाणी करार एकतर्फी स्थगित केल्याचा पाकिस्तानने विरोध केला आहे व जागतिक बँक आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, जागतिक बँक या कराराचा एक भाग आहे आणि म्हणूनच भारताला असा निर्णय एकट्याने घेण्याचा अधिकार नाही. असंही पाकिस्तानने म्हंटले आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय जवान दहशदवाद्यांचा शोध घेत आहेत. तसेच भारतीय जवान एकामागून एक कारवाई करत आहेत. याच कारवाईत एका जवानाला बलिदान द्यावे लागले आहे.