Pahalgam Terrorist Attck: जम्मू काश्मिरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारही अॅक्शन मोडवरती असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. परंतु पाकिस्तानच्या कुरघोड्या मात्र अद्याप सुरुच आहेत.
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवर भारतीय सैनिकांनीही गोळीबार केला. परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती समोर येत आहे.
हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरूद्ध काही निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचा शिमला करार आणि इतर द्विपक्षीय करार स्थगित केले आहेत. तसेच सर्व व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्रही बंद केले आहे.
विशेष म्हणजे भारताने सिंधू जल कराराला स्थिगीती दिल्याच्या निर्णयावर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले आहे. भारताने सिंधू पाणी कराराअंतर्गत वाटप केलेल्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचा किंवा बदलण्याचा कोणताही प्रयत्न युद्ध छेडण्यासारखा मानला जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. या सगळ्यावरून जाणवते की,भारत पाकिस्तान संबंध जास्त चिघळण्याच्या मार्गावर आहेत.