UPSC Exam: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका लहानशा गावातून आलेल्या बिरदेव डोणे यांनी UPSC परीक्षेत ५५१ वा क्रमांक मिळवून एक प्रेरणादायी यश संपादन केले आहे. त्यांचे वडील मेंढपाळ असून बिरदेव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत यश मिळवले आहे. सध्या सोशल मीडियावर बिरदेव डोणे यांचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
2024 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल 22 एप्रिल रोजी दुपारी जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे जेव्हा निकाल जाहीर झाला होता तेव्हा देखील बिरदेव हे मेंढ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. निकाल लागल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवाराने, कुटुंबातील सदस्यांनी एका पालावर बिरदेवचा धनगरी फेटा बांधून आणि घोंगडे देऊन सत्कार केला. त्यांचा हा फोटो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
बिरदेव यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. लहानपणापासूनच त्यांना प्रशासकीय अधिकारी होण्याची तीव्र इच्छा होती. आपल्या पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले तरी त्यांनी हार मानली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले.
बिरदेव यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यूपीएससी परीक्षेची जोरदार तयारी सुरु केली होती. परीक्षेच्या तयारीसाठी ते काही काळ दिल्लीला देखील गेले होते. दिल्लीत त्यांनी क्लास देखील लावला होता. दिल्लीतल्या अभ्यासिकांमध्ये ते रात्रंदिवस अभ्यास करत असे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय त्याच्या पदवीच्या शिक्षणापेक्षा वेगळे होते. परंतु त्यांनी कसून अभ्यास करून यश खेचून आणले.