Sharad Pawar: नुकतीच शरदचंद्र पवार गटाबद्दल एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
16 एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. जितेंद्र आव्हाड यांच्या या भूमिकेला पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. प्रवक्ते महेश तपासे यांनी पक्षातील जेष्ठ नेत्याला केलेला विरोध लक्षात घेता त्यांची मुख्य प्रवक्ता पदावरून हाकलपट्टी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे.
महेश तपासे यांचे आजोबा आणि माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी यापूर्वीच पानिपत येथे शौर्य स्मारक बांधले आहे. त्यामुळे तपासे यांनी सरकार बांधत असलेल्या स्मारकाला पाठिंबा दिला आणि पक्षातील नेत्यांना विरोध केला. त्यानंतर महेश तपासे यांच्या भूमिकेचा प्रभाव इतर प्रवक्त्यांवरही पडत आहे, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने याबाबत अॅक्शन घेत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशा चर्चा आहेत. यासंदर्भात पक्षाकडून एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये २३ एप्रिलपासून म्हणजे बुधवारपासून प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवक्त्यांच्या नियुक्त्यांवर पक्षाकडून पुढे काय निर्णय घेतला जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.