Terrorist Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान विरोधात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातीलच एक निर्णय म्हणजे भारताने भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या पुणे शहरात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील 91 पाकिस्तानी नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेले आहेत. तर 20 जण व्हिजिटर व्हिसावर दाखल झालेले आहेत. पुण्यातील परदेशी नागरिक नोंदणी केंद्राकडे याबाबतची नोंद झालेली आहे. त्यातील तिघांनी पुणे पोलिसांची परवानगी घेऊन स्वेच्छेने देश सोडला आहे.
बरेच पाकिस्तानी नागरिक हे नातेवाईकांना भेटण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी भारतात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी संबंधित पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेतली असून, त्यांच्या वास्तव्याबाबतची पडताळणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, भारताने पाकिस्तानविरूद्ध काही निर्णय घेतले असता आता पाकिस्ताननेही भारतासोबतचा शिमला करार आणि इतर द्विपक्षीय करार स्थगित केले आहेत. तसेच सर्व व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्रही बंद केले आहे. तसेच भारताने सिंधू कराराला स्थिगीत देणे म्हणजे युद्ध छेडण्यासारखा मानले जाईल, असे देखील पाकिस्तानने म्हटले आहे.