नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. न्यायालयाने सांगितले की, स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करणे योग्य नाही आणि अशी विधाने पुन्हा केल्यास गंभीर दखल घेतली जाईल. राहुल गांधी हे राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे, असेही न्यायालयाने बजावले आहे.
राहुल गांधींनी सावरकरांवर काय भाष्य केले होते?
राहुल गांधी यांनी १७ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रात पत्रकार परिषदेत सावरकर हे इंग्रजांचे सेवक आणि पेन्शनधारक होते, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल झाली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना समन्स बजावले. त्यानंतर राहुल गांधी यांनी ते समन्स रद्द करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात अर्ज केला, पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. शेवटी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
न्यायालयाने म्हटले की, महाराष्ट्रात वीर सावरकरांची पूजा केली जाते, त्यामुळे अशा वक्तव्यांमुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सांगितले की, जर राहुल गांधींना इतिहासाची नीट माहिती असती, तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते.
त्यांनी हेही सांगितले की, महात्मा गांधींनी ब्रिटिशांना पत्र लिहिताना “तुमचा विश्वासू सेवक” असा शब्द वापरला होता आणि इंदिरा गांधींनीही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते.
आता सर्वोच्च न्यायालयाने सध्या खालच्या न्यायालयातील कार्यवाहीला स्थगिती दिली आहे, तसेच न्यायालयाने राहुल गांधींना भविष्यात अधिक जबाबदारीने आणि संयमाने बोलण्याचा इशारा दिला आहे. राजकीय मतभेद असले तरी देशाच्या इतिहासाशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींविषयी बोलताना आदर आणि समजूतदारपणा ठेवणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.