सिक्कीममधील मुनशिथांग आणि लेमा/बॉब येथे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 1000 पर्यटक या भागात अडकले आहेत. गुरुवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. लाचेन-चुंगथांग आणि लाचुंग-चुंगथांग रस्त्यांवर हे भूस्खलन झाले, ज्यामुळे या प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अशास्थितीत याठिकाणी बचाव मोहीम सुरु असून, पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत आहे.
उत्तर सिक्कीममधील मंगन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोनम देचू भुतिया यांनी या परिस्थितीवर माहिती देताना सांगितले की, ‘परिसरात सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे रात्री प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. लाचेन-चुंगथांग रस्त्यावर मुनशिथांग येथे आणि लाचुंग-चुंगथांग रस्त्यावर लेमा/बॉब येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. चुंगथांगला जाणारा रस्ता आता खुला आहे पण मुसळधार पावसामुळे रात्री तिथे पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे उद्यासाठी कोणतेही नवीन परवाने दिले जाणार नाहीत आणि आधीच जारी केलेले सर्व आगाऊ परवाने रद्द करण्यात आले आहेत.’
https://x.com/PTI_News/status/1915604424455860531
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने टूर ऑपरेटर्सना सूचना जारी केल्या आहेत की, कोणत्याही परिस्थितीत पर्यटकांना शुक्रवारी उत्तर सिक्कीमला पाठवू नये.