Dr Shirish Valsangkar News: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी रात्री ८. ३० वाजता स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. सोलापूरमधील मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घरातच त्यांनी स्वतःवर गोळी झाडत जीवन संपवले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
वळसंगकर यांच्या हत्येनंतर त्यांची सुसाईड नोट मिळाली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मनीषा माने नावाच्या महिलेच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. मनीषा माने ही वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होती. या प्रकरणी सुरवातीला मनिषाला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.
परंतु पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर, पुन्हा तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात तिच्या कोठडीची मागणी केली. त्यानंतर मुख्य न्यायादंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी मनिषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे मनिषा मानेबद्दल रूग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांना तक्रारी आहेत. त्यातच २४ एप्रिलला मनिषाला चौकशीसाठी रूग्णालयात नेले असता तिथे अजब प्रकार पाहायला मिळाला. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मनिषा मानेला पाहून प्रचंड संताप व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी वळसंगकर यांच्या हत्येप्रकरणी डाॅक्टरांचे चिरंजीव डॉ. अश्विन, डाॅक्टरांची सून शोनल वळसंगकर यांचीही चौकशी केली आहे. परंतु या आत्महत्येला जबाबदार कोण, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.