भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे आज (25 एप्रिल) सकाळी निधन झाले आहे. के. कस्तुरीरंगन ८४ वर्षांचे होते. कस्तुरीरंगन यांनी बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ते गेल्या काही काळापासून आजारी होत असे देखील सांगण्यात येत आहे. के. कस्तुरीरंगन यांचे पार्थिव २७ एप्रिल रोजी रमण संशोधन संस्थेत (आरआरआय) अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या माजी प्रमुखांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हंटले आहे की, ‘ भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक महान व्यक्तिमत्व असलेले डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि राष्ट्रासाठी निस्वार्थ योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांनी इस्रोमध्ये खूप मेहनतीने काम केले आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. त्यांचे लक्ष नेहमीच नावीन्यपूर्णतेवर राहिले आहे. नवीन शिक्षण धोरण (एनईपी) साठी भारत नेहमीच डॉ. कस्तुरीरंगन यांचे आभारी राहील. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी मार्गदर्शक होते. त्यांच्या कुटुंबियांना, विद्यार्थ्यांना, शास्त्रज्ञांना आणि असंख्य चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत.
https://x.com/narendramodi/status/1915688032658924003
डॉ. के. कस्तुरीरंगन यांना त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. २००३ ते २००९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. याशिवाय, ते बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक, नवीन शिक्षण धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष आणि राजस्थान येथील एनआयआयटी विद्यापीठाचे अध्यक्ष होते. डॉ. कृष्णा कस्तुरीरंगन हे नवीन शैक्षणिक धोरण २०२० चा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्षही होते.
इस्रोचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली, अंतराळ कार्यक्रमाने अनेक मोठे टप्पे गाठले. त्यांनी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) चे यशस्वी प्रक्षेपण आणि GSLV ची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. याशिवाय, त्यांनी IRS-1C आणि 1D उपग्रहांचे डिझाइन, विकास आणि प्रक्षेपण, दुसऱ्या पिढीतील INSAT उपग्रहांचे बांधकाम आणि तिसऱ्या पिढीतील प्रक्षेपण, तसेच महासागर निरीक्षण उपग्रह IRS-P3/P4 चे प्रक्षेपण यांचेही निरीक्षण केले.
डॉ. कस्तुरीरंगन यांनी उच्च ऊर्जा क्ष-किरण आणि गॅमा किरण खगोलशास्त्र तसेच प्रकाशीय खगोलशास्त्रात संशोधन केले. त्यांनी वैश्विक क्ष-किरण स्रोत, खगोलीय गॅमा-किरण स्फोट आणि वैश्विक क्ष-किरणांचा खालच्या वातावरणावर होणारा परिणाम यांच्या अभ्यासात व्यापक आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.