जम्मू कश्मिर मधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये दहशदवाद्यांनी फक्त पर्यटकांना लक्ष केले, याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना धर्म विचारून मारण्यात आल्यानंतर देशातून संपताची लाट उसळत आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना येथील स्थानिक नागरिक देखील पर्यटकांच्या मदतीसाठी पुढे धावून आले. अशातच एका स्थानिक २० वार्षिय युवकाला आपला जीव गमवावा लागला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह याचा या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते व सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून सय्यदच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
२० वर्षाचा सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचे काम करायचा. सय्यद त्या दिवशी त्याच्या घोड्यावरुन प्रवास करणाऱ्या पर्यटकाच्या बचावासाठी पुढे आला त्याने दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली ज्यात त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे सध्या श्रीनगरमध्ये आहेत.